बांगलादेशातून ईमेल, गल्याच्या तळमजल्यावर पोलिसांनी छापा टाकला अन्…

एका बंगल्याच्या तळमजल्यावर सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर छापा टाकून मानपाडा पोलिसांनी पाच दलालांसह घर मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. जबरदस्तीने या व्यवसायाच्या बळी ठरलेल्या ७ तरुणींची सुटका केली आहे.

फ्रीडम फर्म ही संस्था महिला आणि मुलांसाठी काम करते. या संस्थेला बांगलादेशातून ईमेलद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बांग्लादेशातून नोकरी देण्याच्या उद्देशाने भारतात बोलावून घेतलेल्या १९ वर्षीय मुलीशी संपर्क होत नसून ती हेदूटणे परिसरात असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी मानवी तस्करी विभागासह ठाणे पोलिसांना माहिती देत मानपाडा पोलिसांच्या मदतीने हेदूटणे परिसरातील योगेश काळणचे घर गाठले.

पोलिसांनी या घराची झडती घेतली असता तळमजल्यावर काही मुलींना जबरदस्तीने डांबून ठेवल्याचे आणि त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात असल्याचे दिसून आले. छापा पडल्याचे कळताच यातील मुख्य आरोपी युनिस शेख उर्फ राणा आणि त्याचे चार साथीदार जवळच्या झाडीमध्ये पळाले मात्र पोलिसांनी पाठलाग करत सर्व आरोपींना अटक केली. सर्व महिलांची सुटका करत त्याना महिलांना सुधारगृहात पाठवल्याचे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.

‘घर भाडेतत्त्वावर देताना सावधान’

दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला घर भाड्याने देण्याआधी पोलिसांची ना हरकत परवानगी घेणे आवश्यक असून नागरिकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. राणा याने अधिक भाड्याचे आमिष दाखवत योगेश काळण याच्या बंगल्याच्या तळमजल्यावरील खोल्या भाड्याने राणा याला दिल्या होत्या. तसेच या तरुणीच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करण्यासदेखील आरोपींना मदत केल्याचा ठपका पोलिसांनी काळण याच्यावर ठेवला आहे.