बापरे! धावत्या ट्रेनमध्ये महिला टीसीला मारहाण

चर्चगेट-गोरेगाव लोकलमध्ये ही घटना घडली आहे. ट्रेन दादर स्थानकात आल्यावर दोन महिला टिसि फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात चढल्या. त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आणि सर्वांना तिकीट दाखवण्यास सांगिते. यावेळी एका तरुणीकडे तिकीट नव्हाते. तिकीट दाखवण्यास सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली.

तिच्याकडे तिकीट नसल्याचे समजताच महिला टिसिने तिला दंड भरण्यास सांगितलं. दंडाची रक्कम भरण्याऐवजी या तरुणीने टिसिशी हुज्जत घातली. पुढे तिने टिसिला मारहाण केली. महिला टिसिच्या कानशिलात लगावली तसेच हाताचाही चावा घेतला. त्यामुळे ट्रेनमधील इतर प्रवाशांनी आपातकालीन साखळी खेचली.

यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रेन माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान बराचवेळ थांबली होती. ट्रेन थांबल्यानंतर बराच वेळ प्रवाशांचा खोळंबा झाला. पुढे वांद्रे स्थानकात पोहचल्यावर पोलिसांच्या मदतीने तरुणीला खाली उतरवण्यात आले. रात्री उशिरा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये सातत्याने भांडण, हाणामारी अशा विविध घटना घडत असतात. अनेक प्रवसी बिना तिकिटाचेही प्रवास करतात. अशावेळी धावत्या ट्रेनमध्ये जर टिसि आले तर अनेकांची धांदळ उडते. मग टिसिला टाळण्यासाठी बरीच कारणे सांगितली जातात. अशात आता महिला टिसिला मारहाण झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय.