आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होत आहे. आज सकाळी 11 वाजता विधान परिषद तर दुपारी 12 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालेल. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.

या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.27 फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर लगेच दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.

अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज तसेच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लेखानुदान प्रस्ताव आणि लेखानुदान विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येईल.