खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. पोटनिवडणुकीसाठी सोलापूर येथून 700 ईव्हीएम मशीन आणत त्याची तपासणी करण्यात आली.
खानापूर-आटपाडीचे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे 31 जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या रिक्त जागी निवडणूक होणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने Election Commission ईव्हीएम मशीन उपलब्धकरुन दिल्यामुळे पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यासोबत खानापुरची पोटनिवडणूक घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाने पंधरा दिवसांपूर्वी खानापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माहिती मागवली होती. जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाची माहिती देवून पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
सोलापूर येथून 700 ईव्हीएम मशीन उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांचा समावेश आहे. त्याची तांत्रिक तपासणी करुन खानापुरातील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाकडून ज्या पद्धतीने सूचना दिल्या जातील. त्याप्रमाणे पोटनिवडणुकीची कार्यवाही केली जात आहे.