सोलापूर जिल्ह्यात २ पथकांकडून ५ परीक्षार्थींवर कॉपीप्रकरणी कारवाई

इयत्ता बारावीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (एमसीव्हीसी) इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर आज (शुक्रवारी) उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्या भरारी पथकाने कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली.दुसरीकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला मराठीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला. तत्पूर्वी, प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा ‘एमसीव्हीसी’चा पेपर होता.

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव केंद्रावर अचानक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांचे भरारी पथक पोचले. त्यावेळी एका विद्यार्थ्याने खिडकीत पुस्तकच ठेवल्याचे दिसून आले. दुसरीकडे एका विद्यार्थिनीने कपड्यात उत्तराची दहा पाने लपवून ठेवली होती. त्या दोन्ही विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल पुणे बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर कॉपी करून उत्तरे लिहायला सुरू असल्याच्या तोंडी तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. पण, भरारी पथके त्याठिकाणी जात नसल्याने विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास संधी मिळत असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत कुर्डुवाडी (ता. माढा) येथील भिसे कॉलेज, मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय, माळशिरसमधील पिराळे ज्यु. कॉलेज व आता अक्कलकोटमधील चपळगाव अशा चार केंद्रांवरील पाच विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.