सोलापूरचे विमानतळ बंदमुळे प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना हेलिकॉप्टरचाच पर्याय

सोलापूर येथील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद असून त्याठिकाणी रन-वे, सरंक्षक भिंत, ड्रेनेज लाईन टाकणे अशी कामे सुरू आहेत. कामे पूर्ण व्हायला जुलै उजाडणार असल्याचे विमानतळाचे अधिकारी सांगत आहेत.त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या व्हीआयपी, व्हीव्हीआयपी नेत्यांना हेलिकॉप्टरनेच यावे लागणार आहे. त्यातही रे नगर आणि सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन ठिकाणीच हेलिपॅडची सोय आहे. त्यामुळे प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना त्यांचे विमान शेजारील जिल्ह्यात उतरवून तेथून हेलिकॉप्टरनेच यावे लागणार आहे.

सोलापूरची विमानसेवा आगामी काही महिन्यांत सुरू होईल, पण तूर्तास याठिकाणी ना विमान ना हेलिकॉप्टर उतरू शकते. धाराशिव जिल्ह्यात एक रन-वे सुरू करण्यात आला आहे. परंतु, त्याठिकाणी मोठे विमान उतरू शकत नाही, केवळ लहान चार्टर विमानच उतरू शकते. त्यामुळे पुणे किंवा कलबुरगी विमानतळावर विमान उतरवून तेथून हेलिकॉप्टरने सोलापुरात प्रचारसभेसाठी व्हीव्हीआयपी नेते येऊ शकतात.२६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूर शहरात सभेसाठी येतील, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पण त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांना यायचे असल्यास हेलिकॉप्टरचा देखील वापर करता येणार नाही. कारण, सोलापूरमध्ये हेलिकॉप्टरची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे अनेक व्हीआयपी नेत्यांना शेजारील जिल्ह्यात हेलिकॉप्टर उतरवून रस्त्यानेच यावे लागेल अशी स्थिती आहे.