चाराटंचाई! परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी

सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ४० तालुक्यात व १०२१ महसुली मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यातही चारा टंचाई होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात तसेच परराज्यामध्ये विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५८ ठिकाणी चेकपोस्ट तैनात केले असून, या ठिकाणी निवडणूक कर्मचारी कार्यरत असतील. तसेच सीमावर्ती भागातून चारा विक्रीसाठी परजिल्ह्यात जाऊ नये, यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी याच ठिकाणी तैनात असणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

प्रत्येक चेकपोस्टवर सीसीटीव्ही असणार आहेत. चारा वाहतूक रोखण्यासाठी निवडणूक संपल्यानंतरही चेक पोस्टवर कर्मचारी तैनात असतील, अशीही माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.