महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोल्हापूर जागेचा मुद्दा कळीचा झाला असतानाच आता ही जागा काँग्रेसला सुटल्याची चर्चा आहे. या जागेवर करवीर संस्थांनचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही जागा ठाकरे गटाकडून काँग्रेसला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज हे महाविकास आघाडीकडून रिंगणात असतील, अशी चर्चा असतानाच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या निवडणुकीतील रिंगणावरून भाष्य करताना त्यांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये असं वक्तव्य केलं होतं. यावर आता माजी मालोजीराजे छत्रपती यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे.
मालोजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांनी मांडलेल्या भूमिकेवर म्हणाले, की महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे ही सर्वच घटकांमधून चर्चा सुरू आहे. टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वांची इच्छा आहे की महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहिले पाहिजे. मात्र महाविकास आघाडी काय निर्णय घेणार यावर सर्व अवलंबून आहे. ते चांगला निर्णय घेतील अशी आशा असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर लढलं पाहिजे याबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, चांगल्या, प्रामाणिक माणसाने राजकारणात उतरू नये का? अशी विचारणा त्यांनी केली. चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेज, चांगलं काम झालं पाहिजे तर मग त्याला शाहू महाराज एक उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. यामध्ये गैर वाटण्याचं काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे का? यावर बोलताना त्यांनी ही लोकशाही असून आणि लोकशाहीमध्ये जनताच ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाहू महाराजांच्या उमेदवारीवर चर्चा सुरु असताना म्हणाले होते की, शाहू महाराज आमच्यासाठी सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे. शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसेच राहावं असा आम्हाला वाटते. मात्र, लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचे असते की कोणाला निवडून द्यायचं किंवा नाही. याबाबत त्यांना विनंती केली असल्याचेही ते म्हणाले होते.