इचलकरंजीतील शाहूनगरमध्ये चोरी!

चंदूर रोडवरील शाहूनगर गल्ली नं. १३ मध्ये घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी तिजोरीचे लॉक तोडून १.६३ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व पॅण्टच्या खिशातील १० हजाराची रोकड असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी चंद्रकांत मल्लिकार्जुन म्हेत्रे (वय ४३) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यांचा यंत्रमागाचा व्यवसाय आहे.. ते राहण्यास असलेल्या घरातच पोटमाळा आहे. सोमवारी म्हेत्रे कुटुंबिय पोटमाळ्यावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास म्हेत्रे हे शौचालयात गेले असताना त्यांनी मुख्य दरवाजा पुढे केला होता. नेमकी हीच संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून आतील लॉकरमध्ये ठेवलेले २० ग्रॅमचा लक्ष्मी हार २ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची कानातील वेल, ६ ग्रॅमचे २ जोड टॉप, ४ ग्रॅमचा चांदीचा कडा, २ क्वॉईन व ५० ग्रॅमचे चांदीचे पैंजण तसेच पॅण्टच्या खिशातील १० हजाराची रोकड असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. म्हेत्रे हे शौचालयातून आले असता त्यांचा घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जावून पाहिले असता तिजोरी सताड उघडी असल्याचे व साहित्य विस्कटल्याचे दिसून आले. या प्रकरणी म्हेत्रे यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.