काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंगळवेढ्यातून…..

आगामी लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजत असताना सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा आखला होता. या तालुक्यातील २४ गावे पाण्याविना तहानलेली समजली जातात. त्याबद्दल स्थानिक गावक-यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येते.

यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा स्थानिक गावकऱ्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी हाच कळीचा मुद्दा पुढे करून विधिमंडळ अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर बुधवारी त्या मंगळवेढा तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी आल्या होत्या.

मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका सोलापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींना बसत असून त्याची झळ काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनाही सोसावी लागली.मंगळवेढा भागात गावभेटीवर आल्या असताना आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना गावात सभा घेण्यात तीव्र विरोध करून परत पाठविण्यात आले.

पाटखळ येथून गावभेट सुरू करीत असताना गावातील सुमारे दोनशे तरुणांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर त्यांना रोखले. आमदार प्रणिती शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता मराठा आरक्षण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्या व इतर साहित्य दुसऱ्या ठिकाणी सभामंडपात हलवून सभा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही विरोध झाला. त्यामुळे शेवटी आमदार प्रणिती शिंदे यांना गावभेट दौरा करणे शक्य झाले नाही.