बाजारपेठेत विविध स्टॉल सजू लागले

इचलकरंजी, वर्षभरातील सर्वात मोठा दिवाळी सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यासह विविध चौक रंगीबेरंगी आकाशदिवे, रांगोळ्या, पणत्या, कपड्यांचे स्टॉलनी सजली आहे. तर खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.वस्त्रनगरीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दिवाळी साजरी केली जाते. त्यादृष्ट व्यावसायिकांनीही साहित्यांची मांडामाड करून जय्यत तयारी केली आहे.

इचलकरंजी शहर परिसरात सर्वच सण उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव नवरात्रौत्सव मोठ्या मंगलमय आणि दिमाखात साजरा केल्यानंतर आता सर्वानाच दिवाळी सणाचे वेध लागले आहेत. घरांची स्वच्छता, रंगकामापासून दिवाळीत लक्ष्मी देवीचे आगमन होणार असल्याने आकाशदिवे पणत्या, रांगोळ्यासह सजावटीच्या साहित्याची बाजारपेठेत चांगलीच रेलचेल सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर म्हणजे महात्मा गांधी पुतळा ते श्री शिवतीर्थ पर्यंत दोन्ही बाजूने विविध स्टॉल सजू लागले आहेत. दिवाळीतील मुख्य सण लक्ष्मीपूजन मंगळवार, ता. २१ ऑक्टोबरला असल्याने खास लक्ष्मी पूजनाच्या साहित्याची मागणी वाढणार असल्याने त्या दृष्टीने व्यावसाययिकांनी तयारी ठेवली आहे. प्लास्टिकचे स्वास्तिक, लक्ष्मीची पावले, गोल्डन रांगोळी, स्टिकर्स रांगोळी, डिझाईन पट्टया, शुभ- लाभ असे साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

 विविध साहित्याबरोबर लहान मुला- मुलीपासून युवक-युवती, महिला-पुरूष अशा सर्वांसाठी विविध कपड्यांचे स्टॉलसह विविध लहान मोठी दुकाने सजली असून खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.वस्त्रोद्योगाचा महत्त्वाचा घटक असलेल्या कामगारवर्गाला पगार व बोनस येत्या दोन दिवसात हातात मिळण्याची शक्यता आहे.त्यानंतर शहरातील बाजारपेठेत खरेदीला गर्दी उसळणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शहरातील मुख्य रस्त्यासह विविध चौकात विविध स्टॉल उभारण्यात आले आहे. त्यामध्ये म. गांधी पुतळा ते श्री शिवतीर्थ पर्यंतच्या रस्त्यावर सांयकाळनंतर खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी होत आहे.