वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस अनेक गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राजेरोसपणे अनेक अवैध्य धंदे सुरु आहेत. त्यामुळे शहरवासियांमधून संतापाची लाट उसळत आहे. अशातच इचलकरंजीतील कोरोची परिसरात एका 52 वर्षीय सुरक्षारक्षकावर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे समोर आले आहे.
कामावर असलेल्या 52 वर्षीय पुरुषावर शुक्रवारी मध्यरात्री संशयिताने अमानवी लैंगिक अत्याचार केला. पीडित पुरुष कोरोची परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एकटा होता. संशयिताने या परिस्थितीचा फायदा घेत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केला. पीडित पुरुषाने शनिवारी सकाळी हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी संशयिताला पकडून त्याला बेदम चोप दिला. यानंतर दोघांनाही इचलकरंजी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.शनिवारी दुपारी पीडित सुरक्षारक्षकाची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.
सीपीआर रुग्णालयाच्या पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर कोरोची परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “सुरक्षारक्षकांवरच असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यांनी या घटनेत सामील व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.