आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सरकारकडून निर्णयांचा धुमधडाका लावण्यात येणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने येत्या आठवड्यात दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय येत्या काळात अनेक विभागांकडून विविध शासन निर्णयही जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. येत्या १४ मार्च रोजी या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शिंदे-फडणवीस सरकारनेही तयारीचा वेग वाढविला आहे. आचारसंहिता लक्षात घेता राज्य सरकारने गेल्या आठवड्याभरापासून अनेक निर्णयांना मंजुरी देण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे.
त्यामुळेच येत्या आठवड्याभरात दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून ११ मार्च आणि १२ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.या बैठकीपूर्वीच जवळपास सर्वच मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत कार्यक्रमांचे व विकासकामांच्या शुभारंभाचे आयोजन केले आहे. त्याशिवाय अनेक मतदारसंघात सध्या बैठकांचे सत्र सुरू असून येत्या काळात घेतल्या जाणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाची कशाप्रकारे अंमलबजावणी करायची, याबाबत बैठकीचे आयोजन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.