निवडणूक आयोग पुढील आठवड्यात १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता असून, ही निवडणूक सात टप्प्यांत घेतली जाऊ शकते.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा १० मार्च रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या.विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ मार्चपासून तेलंगणातून सुरू झालेला १२ राज्यांचा १० दिवसांचा झंझावती दौरा संपवत आहेत. गुजरातमध्ये या दौऱ्याचा समारोप होणार आहे. तिथे तीन सेमीकंडक्टर प्रकल्पाचे आणि आसाममधील प्रकल्पाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते भूमिपूजन करतील.
पंतप्रधानांनी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू आणि काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीचा दौरा केला आहे. पश्चिम कामेंग येथील सेला बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिली आणि जोरहाटमधील लचित बरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते आसामला गेले. १० मार्च रोजी पंतप्रधान वाराणसी आणि आझमगढ येथे जातील आणि ११ मार्च रोजी दिल्लीतील ‘नमो ड्रोन दीदी’ आणि ‘लखपती दीदी’ कार्यक्रमांना उपस्थित राहतील. नंतर हरयाणा विभागातील कामाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते गुजरात आणि राजस्थानला जातील.