शहरासाठी सुळकुड पाणी योजनेसाठी लढा सुरू असताना शिरोळ तालुक्यातील शिरटी येथून कृष्णा नदीतून पाणी पुरवठा योजना राबवण्याचा पर्याय पुढे आणला जात असताना आता या वादात आणखी एका पाणी योजनेची भर पडली आहे.
वारणा धरणातून थेट पाईपलाईन हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी योग्य पर्याय असल्याची भूमिका पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती, शाहीर विजय जगताप यांनी शनिवारी व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी सांगितले की, इचलकरंजी शहरातील वाढत्या नागरीकरण, उद्योगासाठी भावी काळात मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. यापुर्वी आपण स्वतः पाणीपुरवठा सभापती असताना साडेतीन मीटरचा बंधारा उभारला. शहरात २५० हून अधिक बंकर्स मारून पाईपद्वारे पाणी पुरविले. सध्या शहरातील भुगर्भातील पाणी पातळी कमी होत असल्यामुळे बोअर्सही अपुरे पडणार आहेत. १९८५ पुर्वी या शहरासाठी थेट वारणा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणून टोप येथे साठा करावयाचा आणि ते पाणी चोकाक ओढ्यातून इचलकरंजीसाठी सोडायचे अशी योजना होती.