पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर आणि सांगली हे तीन लोकसभेचे मतदार संघ हे भाजपाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचे आहेत. त्यात सांगली आणि हातकलंगलेवर भाजप म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवरील भाजपचे नेते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी तपोवन मैदानावर सभा होणार आहे. त्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच इचलकरंजीत दाखल होणार आहेत.
कदाचित 1 मे महाराष्ट्र दिनी त्यांची विराट सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी महायुतीकडून नियोजन सुरू असल्याचे समजत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचा असला तरी मोदी यांना बळ देण्यासाठी योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजी मध्ये जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.