एप्रिलपर्यंत सोलापूरकरांना 4 दिवसांआडच पाणी! मेनंतर…..

उजनी धरण तळ गाठत असल्याने सोलापूर शहराला एप्रिलपर्यंत चार दिवसांआड तर मेपासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.उणे २० टक्के साठा झालेल्या उजनी धरणातून सध्या भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे.

आठ दिवसांत पाणी औज बंधाऱ्यात पोचणार आहे, पण बंधाऱ्यात सध्या पाच-सहा दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे उजनीतील पाणी औजमध्ये पोचेपर्यंत बंधाऱ्यात चर मारून डोहातील पाणी जॅकवेलपर्यंत आणून पाणीपुरवठा करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरण असो वा बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे.

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठल्याने १० मार्चपासून पाणी सोडण्याची महापालिकेची मागणी होती, पण आढेगाव खुर्द येथील ग्रामस्थांचे नदीत केटीवेअर बांधण्यासाठी आंदोलन सुरु होते, त्यामुळे सोलापूर शहरासाठी विलंबाने पाणी सोडण्यात आले.