सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीत कोणाला मिळेल, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. अद्याप जागावाटप झालेले नसताना सांगलीची काँग्रेसची जागा काढण्यात माझा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील कॉंग्रेस नेते करत आहेत.याबाबतच्या बेजबाबदारपणे केल्या जाणाऱ्या उलट-सुलट चर्चेशी माझा काहीही संबंध नाही, असा खुलासा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपुरात केला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे.
लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्व नेत्यांकडे आग्रह धरत आहे.पण सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून पडद्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचा समाचार पक्षश्रेष्ठी घेतील.
पण आता जनतेतून आवाज येत आहे. जनता सगळ्या डावांना ओळखून असल्याची टीका काँग्रेसवाले करत आहेत. अशा बेजाजबदारपणे केल्या जाणाऱ्या उलट-सुलट चर्चेशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मौन पाळणे पसंत केले.