कबड्डीचा पुन्हा जोश! उद्यापासून रंगणार थरार…..

सांगली म्हणजे कबड्डीनगरी. जवळपास कबड्डीची शतकी परंपरा येथे आहे. सांगली तर कबड्डीनगरी म्हणून ओळखली जाते. याच कबड्डीनगरीत ज्येष्ठांच्या कबड्डीचा पहिला प्रयोग दोन वर्षांपूर्वी यशस्वी झाला. हात-पाय फ्रॅक्चर झाले तरी ज्येष्ठांनी त्यांच्यातील जोश दाखवून दिला. आता यंदाचा तिसरा सिझन १५ ते १७ अखेर होत आहे. जिल्ह्यातील काही मंडळांचे ४५ वर्षांवरील कबड्डीपटू सध्या कसून सराव करत आहेत.

लालमातीतील अस्सल खेळ म्हणून कबड्डीला ओळखले जाते. येथील कबड्डीपटूंनी देशभर दबदबा निर्माण केला होता. खेळातून अर्जुन पुरस्कार येथील कबड्डीपटू राजू भावसार यांनी पटकावला. तर शिवछत्रपती पुरस्कारावरही अनेक कबड्डीपटूंनी मोहोर उमटवली. सांगलीतील अनेक मंडळांच्या क्रीडांगणावर सायंकाळी कबड्डी पहायला मिळते. प्रो कबड्डीपासून अनेकजण कबड्डीकडे आकर्षित झाले आहेत. मध्यंतरी शहरासह ग्रामीण भागातील काही मंडळांची कबड्डी थांबली होती. परंतु त्यांनी पुन्हा जोशात कबड्डीला प्रारंभ केला.

तसेच शहरात आणि जिल्ह्यात काही नवीन कबड्डी मंडळांनी खेळाला प्रारंभ केला.
सध्या मॅटवरील कबड्डीमुळे तसेच काही नियमातील बदलामुळे कबड्डी हा वेगवान खेळ बनला आहे. परंतु २० ते २५ वर्षांपूर्वीच्या कबड्डीतील कौशल्य आजही उपयोगी पडते. परंतु अपवाद वगळता नवीन खेळाडूंनी जुन्या खेळाडूंचे कौशल्य प्राप्त केले नाही. परंतु ते कौशल्य नव्या खेळाडूंना पाहता यावे यासाठी माजी आमदार दिनकर पाटील यांनी दोन वर्षापूर्वी ४५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहन दिले. यंदा गावभागातील सिद्धार्थ व्यायाम मंडळाने तिसरी मास्टर्स कबड्डी स्पर्धा १५ ते १७ मार्चअखेर गावभागातील बाबाराव सावरकर मैदान, सिद्धार्थ परिसर येथे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक मंडळाचे खेळाडू कसून सराव करत आहेत.