प्रांताधिकारीपदी दिपक शिंदे यांची नियुक्ती

इचलकरंजी, येथील प्रांताधिकारी श्रीमती मौसमी बर्डे-चौगुले यांची बुधवारी प्रशासकीय कारणास्तव करवीर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) दिपक शिंदे यांची उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. शिंदे हे गुरुवारी पदभार घेण्याची शक्यता आहे.

श्रीमती मौसमी बर्डे – चौगुले या २१ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय कामकाजास शिस्त लावली होती. जून २०२३ मध्ये त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. परंतु तडकाफडकी मुदतपूर्व बदली केल्यामुळे बर्डे – चौगुले यांनी मॅटमध्ये धाव घेत बदलीच्या आदेशाला स्थगिती मिळवली होती. प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असताना श्रीमती बर्डे-चौगुले यांनी महसुल विभागातील गेली अनेक वर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावले. निवडणूक काळातही त्यांनी शिस्तबध्दपणे कार्यक्रम राबविला होता. दिव्यांग व वृध्द पक्षकारांसाठी विशेष वेळ देत त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले होते.