इचलकरंजी महापालिकेने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. सुमारे २४९ आरक्षणे विविध ठिकाणी टाकण्यात आली आहेत. या आरक्षणांवर हरकत दाखल करण्याची अंतिम मुदत १५ मार्चपर्यंत आहे; मात्र अकृषक वापर असतानाही तसेच गुंठेवारी, मोकळ्या जागेवर, घरांवरही आरक्षण पडल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
हरकती घेण्यासाठी झोन नकाशे, भाग नकाशे मिळवताना शहरवासीयांच्या नाकी नऊ आले असून, हरकतींवर समितीने घेतलेल्या निर्णयानंतर आराखड्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आधुनिक भौगोलिक माहिती प्रणालीचा वापरही करण्यात आला आहे. ज्या मालमत्तांवर आरक्षण पडले आहे, त्यांची माहिती घेण्यासाठी नागरिकांची महापालिकेत गर्दी झाली आहे. अनेक ठिकाणी अकृषक वापरावरही आरक्षण पडले आहे. गुंठेवारी केलेल्या मोकळ्या जागेवर यासह काही घरांवरही आरक्षण पडले आहे. यामध्ये काही रस्त्यांचे, तर काही इतर आरक्षणांचा समावेश आहे.
काही ठिकाणी सध्या वापरात असलेल्या छोट्या रस्त्याऐवजी मोठ्या रस्त्याचे आरक्षण पडले आहे. अनेक ठिकाणी रहिवासी भागात आरक्षण पडल्याने असंतोष आहे. यासाठी आरक्षणावर हरकत घेण्यासाठी २० दिवसांत तब्बल ६०० हून अधिक झोन दाखले, भाग नकाशे महापालिकेने दिले आहेत, तर नगररचना विभागात यासाठी गर्दी कायम आहे.