केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्त पदाच्या दोन रिक्त जागांवर ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची निवड झाल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आचारसंहितालागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या दोन्ही नावांना संमती दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आयुक्तपदाची एक जागा अगोदरच खाली होती. त्यातच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने दुसरी जागाही रिक्त झाली होती. या दोन नव्या आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडणार होती. या बैठकीसाठी ते निवडणूक प्रचार सोडून दिल्लीला दाखल झाले होते.
ही निवड तत्काळ होणे गरजेचे होते कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी या जागा रिक्त ठेवायच्या नव्हत्या. खरे तर ही बैठक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन घेण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. कारण, न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये न्यायाधीशांचाही समावेश आहे. पण, सरकारने या प्रक्रियेतून न्यायाधीशांनाच वगळले आणि ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.
