इचलकरंजी शहर परिसरामध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांमधून रात्रीच्या वेळी पेट्रोल काढून घेऊन पसार होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
इचलकरंजी शहर ही औद्योगिक नगरी असल्यामुळे चोवीस तास काम सुरू असते. त्यामुळे नेहमी जागे असणाऱ्या या नगरीमध्ये कामगारवर्ग मोठ्या संख्येने आहे.
त्या अनुषंगाने याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. आता वाहन चोरीबरोबरच चोरट्यांनी पेट्रोल चोरीचा नवा फंडा सुरू केपला आहे. फुकटच्या पेट्रोलवर फिरण्याची सवय अनेकांना लागली असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे पेट्रोल चोरत असल्याचे दिसूनही येत आहे; परंतु अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहन व पेट्रोल चोरणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.