अतिरिक्त वीज सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना वस्त्रोद्योग महासंघाचे निवेदन

यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणीची अट घालण्यात आली आहे.नोंदणीची ही अट रद्द करण्यासह अतिरिक्त सवलतीचा लाभ मार्चपासूनच्या फरकासह मे महिन्याच्या वीज बिलातून यंत्रमागधारकांना देण्याबाबतचा आदेश वस्त्रोद्योग सचिव अथवा वस्त्रोद्योग आयुक्तांमार्फत महावितरण कंपनीस त्वरित द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे पाठवले आहे.राज्य शासनाने अतिरिक्त वीज सवलतीचा आदेश १५ मार्च रोजी जाहीर केला होता. यामध्ये २७ एचपीवरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७ एचपीखालील यंत्रमागधारकांना १ रुपया अतिरिक्त सवलत देण्याचा निर्णय केला होता; मात्र याचा लाभ घेण्यासाठी उद्योगाला वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करण्याची अट घातली आहे. ती जाचक असल्यामुळे त्याला विरोध केला आहे.

नोंदणी करताना अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे सवलत जाहीर होऊनही बहुतांश यंत्रमागधारकांना या अतिरिक्त वीज सवलतीचा अद्याप लाभ मिळालेला नाही. उलट एप्रिलमधील वीज वापराची बिले वाढून आली आहेत. त्यामुळे यंत्रमागधारक हैराण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचारावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नोंदणीची अट रद्द करण्याची घोषणा इचलकरंजीत केली होती. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांना नोंदणीची अट रद्द करावी व मार्चपासूनच्या फरकासह मे महिन्यातील वीज बिलात अतिरिक्त वीज सवलत द्यावी