मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकनं फुंकलं रणशिंग…..

मुंबई इंडियन्स नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत ट्रेड करून हार्दिकचा संघात समावेश केला.

आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. मुंबईने हार्दिकवर किती मेहरबानी केली याचा अंदाज यावरून लावता येईल की, मुंबईला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्मालाही कर्णधारपदावरून हटवण्यात आले. दूरदृष्टी पाहून मुंबईच्या फ्रँचायझीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई इंडियन्सने आता हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हार्दिक म्हणतो की, मुंबई इंडियन्सची जर्सी परत एकदा परिधान करण्याची भावना माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या घरी परतलो आहे. हार्दिकने मुंबई इंडियन्समधूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो आयपीएल २०२१ पर्यंत ७ वर्ष मुंबईचा भाग राहिला.

पण आयपीएल २०२२ पूर्वी मुंबईने त्याला रिलीज केले. त्यानंतर तो दोन वर्ष गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून आयपीएलचा भाग राहिला.दिग्गज लसिंथ मलिंगाचे देखील गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात पुनरागमन झाले आहे. “माली सुरुवातीपासूनच माझा भाऊ आहे आणि मार्क (फलंदाजी प्रशिक्षक) देखील खूप चांगला आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल असे क्रिकेट आम्ही खेळू, जे कोणीच विसरू शकणार नाही”, असेही हार्दिकने सांगितले.