इचलकरंजी, महानगरपालिकेच्या विविध विभागातील वाढलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी गुरूवारी विभागप्रमुखांची (Department Heads) बैठक घेतली. त्यामध्ये विविध विभाग प्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच कामाचा निपटारा तातडीने करा अन्यथा कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांच्या कामासंदर्भात आयुक्तांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे महानगरपालिकेच्या वर्तुळात चर्चा दिवसभर सुरू होती. महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या कारभाराचा विषय नेहमीच चर्चेचा असतो. त्यामध्ये बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य,नगररचना, इस्टेट, आदी विभागांसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असतात. मात्र, या तक्रारींचा वेळेत निपटारा होत नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असतो.’कामाच्या वेळेत अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नसतात. त्यामुळे अनेक तक्रारदार आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात. बैठकीमध्ये आयुक्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरामध्ये कच-याचे जागोजागी ढीग दिसत आहेत. घंटागाडीचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे. या विषयांवर लक्ष वेधले. नगररचना विभागाकडे जागेसंदर्भात तक्रारी येतात. मात्र, त्या सोडविण्याकडे कानाडोळा होतो. त्या तक्रारींचे निर्गतीकरण तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा संदर्भातील कामांचा आढावा घेण्याबरोबरच जे ठेकेदार काम करीत नाहीत, त्यांच्यावर आरोग्य कारवाई करण्याचे आदेश देण्या आले. फेरीवाला उपविधी मंजुरीच्या विषयावर इस्टेट विभागाला जाब विचारण्यात आला. सिटी बसची सुरूवात अद्यापही झालेली नाही. त्यासंदर्भातही सूचना दिल्या. तसेच कामकाजामध्ये सुधारणा होऊन वेळेत कामाचा निपटार न केल्यास कारवाई करू असा इशाराही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिला.
आयुक्त पाटील यांनी घेतली विभाग प्रमुखांची झाडाझडती
