हातकणंगले लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून टीव्हीएस ज्युपिटर या तीन चाकी मोटरसायकलचे वितरण खासदार धैर्यशिल माने यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूरात झालेल्या या कार्यक्रमास खासदार धैर्यशिल माने यांच्यासह सौ. वेदांतिका माने, तेज घाटगे, समर जाधव, झाकीरहुसेन भालदार यांच्यासह अनेक मान्यवर तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग बांधवांना खासदार धैर्यशिल माने यांनी स्वतः फेटे बांधून त्यांचा सत्कार केला, खासदार महोदयांनी स्वत: फेटा बांधल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान दिसत होते, त्यांनी खासदारांच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर बोलतांना खासदार धैर्यशिल माने म्हणाले की, दिव्यांग बांधवाना तीन चाकी मोटरसायकल मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात नवा जोश व उर्मी निर्माण होऊन स्वावलंबी व आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा रोडमॅप तयार करुन विकासात्मक व रचनात्मक कामातून या मतदार संघाचा कायापालट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून खासदार धैर्यशिल माने म्हणाले की, या लोकसभा मतदार संघात केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध विकास योजनाव्दारे ८ हजार २०० कोटीचा निधी आणला असून गावागावात तसेच वाडी-वस्त्यामध्ये विकास कामे गतीने सुरु केली आहेत, या मतदार संघातील नागरिकांना विशेषत: तरुणांना परिसरातच रोजगार मिळावा यासाठी चार नव्या औद्योगिक वसाहती मंजुर केल्या असून त्यांच्या पूर्तीनंतर या भागाचा विकासात्मक कायापालट निश्चितपणे होईल. असेही ते म्हणाले.