आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यावर विराटचा मैदानातच व्हिडीओ कॉल… 

वुमन्स प्रीमियर लीग २०२४ मधील दुसऱ्या पर्वातील विजेतेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा नाव कोरलं आहे. वुमन्स संघाने आरसीबीचा तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मेन्स संघाला आतापर्यंतच्या 16 मोसमात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र वुमन्स संघाने दुसऱ्याच पर्वात ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघावर आरसीबी संघाने 8 विकेटने विजय मिळवला. ट्रॉफी जिंकल्यावर आरसीबी संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सामना संपल्यावर व्हिडीओ कॉल केला. विराटने केलेल्या कॉलचा सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल व्हायरल झाला आहे .रिचा घोष हिने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केल्यावर आरसीबीचे चाहते, ड्रेसिंग रूममधील खेळाडू सगळेच आनंदी झाले. सामना संपल्यावर विराट कोहलीनेही वुमन्स आरसीबी संघाची कॅप्टन स्मृती मंधानाला व्हिडीओ कॉल केला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

प्रथम बॅटींग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव 113 धावांवर आटोपला.  दिल्ली संघाकडून शफाली वर्मा हिने सर्वाधिक 44 धावांची आक्रमक खेळी केली. आरसीबी संघाकडून सोफी मोलिनक्सने तीन विकेट आणि श्रेयांका पाटील हिने चार विकेट घेतल्या. दिल्ली संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी संघाने 19 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर विजय साकार केला. आरसीबीकडून स्मृती मंधाना हिने 31 धावा तर सोफी डिव्हाईन 32 धावा आणि एलिस पेरी नाबाद 35 धावा आणि रिचा घोष नाबाद 17 धावा केल्या.