टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. अलीकडेच त्याला भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. त्याच्याजागी शुबमन गिलकडे जबाबदारी सोपवण्यात आली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे टीममध्ये रोहित शर्माला स्थान मिळालय. त्याच्या आणि विराट कोहलीच्या वनडेमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांचा बाजार गरम आहे. सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma)ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. रोहित सतत मुंबईमध्ये प्रॅक्टीस करतोय. पण तयारी दरम्यान रोहित अशा अडचणीत सापडला की, त्याच्या मदतीसाठी खास मित्र अभिषेक नायरला बचावासाठी उतरावं लागलं.

19 ऑक्टोंबरपासून ऑस्ट्रेलियात वनडे सीरीज सुरु होणार आहे. त्यासाठी रोहित फलंदाजीचा जोरदार सराव करतोय. आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. याच तयारीसाठी तो 10 ऑक्टोंबर रोजी मुंबईच्या प्रसिद्ध दादर शिवाजी पार्क मैदानात पोहोचला. तिथे हिटमॅनने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला. रोहितने नेट प्रॅक्टिसमध्ये बराचवेळ घालवला. माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा शिवाजी पार्कमध्ये सराव करत असल्याच समजल्यानंतर त्याला पाहण्यासाठी शेकडो फॅन्स मैदानात दाखल झाले. रोहितच्या प्रत्येक शॉटवर टाळ्यांचा एकच कडकडाट व्हायचा. कौतुकाचे शब्द कानावर येत होते. आपल्या लाडक्या स्टारला फलंदाजी करताना पाहून चाहते देखील खुश झाले.

रोहितचा नेटमध्ये सराव पाहून काय वाटलं?

रोहितच्या तयारीबद्दल बोलायच झाल्यास दिग्गज भारतीय ओपनर नेट्समध्ये खेळताना चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. रोहितच्या शॉट्सचा टायमिंग परफेक्ट होता. मोठे फटके खेळताना त्याला कुठली अडचण जाणवली नाही. तो एक फटका असा खेळला की, मैदानाबाहेर उभ्या असलेल्या रोहितच्या गाडीच्या काचेला बॉल लागला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मागच्या काही दिवसांपासून रोहित शर्माचा फिटनेस चांगला दिसतोय.