शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील काही दिवसात ट्रेडिंग करण्यासाठी अतिरिक्त वाढीव वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा देशात उदारीकरणाचे वारे वाहत होते तेव्हा शेअर बाजाराचे ट्रेडिंग मोठ्या हॉलमध्ये व्हायचे जिथे नोकरदार आणि सब ब्रोकर ट्रेडिंग करायचे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटसाठी ट्रेडिंग तास वाढवण्यासाठी सेबी ने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यावर काम करत आहे.
शेअर बाजारात टेडिंगची वेळ वाढणार
इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील व्यवहार मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याची चर्चा आहे. जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NSE ने स्टॉक इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत संध्याकाळचे सत्र सुरू करण्याची सेबीची परवानगी मागितली असून या सत्रात व्यापाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यास स्टॉक डेरिव्हेटिव्हजच्या समावेशासह व्यापाराचे तास रात्री ११.५५ पर्यंत वाढवले जाऊ शकते.
ट्रेडिंगचा वेळ वाढला तर काय फायदा काय नुकसान
शेअर बाजारात ट्रेडिंगचा वेळ वाढला तर ९ ते ६ पर्यंत काम करणाऱ्यांसाठी संध्याकाळचे सत्र फायदेशीर ठरेल. परंतु रिटेल गुंतवणूकदारांमध्ये इक्विटी F&O ट्रेडिंगला प्रोत्साहन देणे योग्य आहे का? सामान्यतः सराफा, कमोडिटीज आणि परकीय चलन यांसारख्या एकाच मालमत्तेचा व्यापार करणार्या मार्केटमध्येच जास्त ट्रेडिंगची वेळ आवश्यक असते तर, इक्विटीसाठी कामाचे वाढीव तास अनावश्यक आहे. संध्याकाळच्या सत्रामुळे ओपनिंगमधील मोठे अंतर टाळता येऊ शकते, असा युक्तिवाद केला जात आहे. पण डेटा दर्शवितो की भारतीय बाजार मुख्यतः आदल्या दिवशीच्या बंद पातळीच्या जवळपस उघडतात.
एक अपवाद देखील
पण शेअर बाजारात मुख्यतः देशांतर्गत शेअर्स आणि स्टॉक इंडेक्सचा व्यवहार प्रत्येक देशात होतो. त्यामुळे इतर देशांच्या बाजारपेठेशी व्यापाराच्या वेळा ओव्हरलॅप झाल्याने फारसा फायदा होणार नाही. डाऊ जोन्स किंवा S&P 500 सारखे अत्यंत लोकप्रिय निर्देशांक अपवाद आहेत, ज्याचे जगभरात व्यवहार होते. त्यामुळे त्यांच्या डेरिव्हेटिव्ह्जचा काही एक्सचेंजेसवर दिवसाचे २४ तास व्यापार केला जातो.