पैसे ठेवा तयार, दिवाळीपूर्वी पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तारखेला येणार हा आयपीओ

 आगामी दोन ते तीन महिन्यांत अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आयपीओचीही गेल्या अनेक दिवासांपासून चर्चा आहे. ही एक वाहननिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या आयपीओत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता या आयपीओची संभाव्य तारीख समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा आयपीओ येत्या 14 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ एकूण 25 हजार कोटी रुपयांचा असेल. भारतातला हा आतापर्यंतचा सुर्वांत मोठा आयपीओ असेल. याआधी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ सर्वांत मोठा होता. या आयपीओचा आकार 21 हजार कोटी रुपये होता. मात्र आता ह्युंदाई या कंपनीचा आयपीओ एलआयसीपेक्षाही मोठा असणार आहे. 

ह्युंदाई या कंपनीने आयपीओच्या परवानगीसाठी जून महिन्यात भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला होता. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली होती. या कंपनीकडून एकूण 14,21,94,700 शेअर्स विकले जाणार आहे. हे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल असतील. म्हणजेच या आयपीओत कोणताही नवा शेअर जारी केला जाणार नाही.

माहितीनुसार ह्युंदाई ही कंपनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून एकूण तीन अब्ज अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 25,000 कोटी रुपये उभे करणार आहे. ह्युंदाई मोटर या कंपनीने 1996 साली भारतात उत्पादन घ्यायला सुरुवात केली होती. याआधी 2003 साली मारुती सुझुकी नावाची वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनी आपला आयपीओ घेऊन आली होती. त्यानंतर आता दोन दशकांनंतर वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ येत आहे.