पूर्ववैमनस्य आणि तरुणांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादातून सोमवारी (दि. १८) दुपारी टेंबलाई नाका झोपडपट्टीत झालेल्या दगडफेकीप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ४५ जणांवर गुन्हा दाखल केला.संशयितांची धरपकड सुरू असून, टेंबलाई नाका झोपडपट्टी आणि ताराराणी चौक परिसरातील माकडवाला वसाहतीत पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.
याप्रकरणी बादल प्रदीप जाधव (वय २४, रा. टेंबलाईनाका झोपडपट्टी) याने फिर्याद दिली.टेंबलाईनाका झोपडपट्टी आणि माकडवाला वसाहतीमधील तरुणांच्या दोन गटात गेल्या काही महिन्यांपासून वाद धुमसत आहे. नागाळा पार्क परिसरातील एका कॉलेजमध्ये आपलाच गट प्रबळ असल्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात दोन्ही गटात वाद झाला होता.
यातून सोमवारी दुपारी माकडवाला वसाहत येथील ४० ते ५० जणांनी सशस्त्र हल्ला करून टेंबलाई नाका झोपडपट्टीत प्रचंड दहशत माजवली. तलवारी, कोयते, हॉकी स्टीक, क्रिकेटच्या स्टंम्पने वाहनांची तोडफोड करून जमावाने नागरिकांना धमकावले.
याप्रकरणी बादल जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी २० जणांसह अनोळखी २५ अशा एकूण ४५ संशयित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. संशयितांची धरपकड सुरू असल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.