धक्कादायक निकाल! मतदारांनी नाकारली बलाढ्य नेते सतेज पाटील-महाडिकांची युती

संपूर्ण करवीर तालुक्याचे लक्ष लागलेल्या व अतिसंवेदनशील असलेल्या चिंचवाड (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काल मतमोजणीनंतर मतदारांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या संयुक्त ग्रामविकास आघाडीला सपशेल नाकारल्याचं स्पष्ट दिसून आले.

विशेष म्हणजे, या संयुक्त आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवारही पराभूत झाल्या. येथे अपक्ष उमेदवारांना विजयी करुन वेगळा संदेश मतदारांनी जिल्ह्याला दिला आहे. अनुसूचित जमातीसाठीची एक जागा उमेदवारी अर्ज नसल्याने रिक्त राहिली.

येथील ग्रामपंचायतीसाठी आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संयुक्त ग्रामविकास आघाडी तयार केली, परंतु ही आघाडी आकारात येतानाच दोन्ही गडातील कार्यकर्त्यांची नाराजी वाढली, अखेर नाराजांनी अपक्ष अर्ज दाखल केले. संयुक्त ग्रामविकास आघाडी विरुध्द अपक्ष असे चित्र तयार झाले.

जिल्ह्यातील दोन बलाढ्य नेत्यांच्या गटाची मोठी ताकद तर अपक्ष म्हणजे मर्यादित ताकद असा समज काही नेत्याचा झाला. अन् धक्कादायक निकाल बाहेर आला. विशेष म्हणजे, सरपंचपदासाठी चुरस होऊन संयुक्त आघाडीच्या वैशाली आप्पासाहेब कोळी यांचा अपक्ष श्रध्दा प्रशांत पोतदार यांनी अवघ्या ३३ मतांनी पराभव केला. एक सदस्य बिनविरोध निवडून आले. तीन ठिकाणी संयुक्त ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार तर आठ जण अपक्ष विजयी झाले. विशेष म्हणजे दोन जागांवर स्वाती आनंदराव आंबी निवडून आल्या.

नेमके काय घडले?

  • आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या संयुक्त ग्रामविकास आघाडीला मतदारांनी नाकारले
  • अनुसूचित जमातीची एकही व्यक्ती गावामध्ये नसल्यामुळे जागा रिक्त राहिली
  • लोकनियुक्त सरपंचपदी अपक्ष श्रध्दा प्रशांत पोतदार ३३ मतांनी विजयी
  • सदस्यपदासाठीच्या आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी
  • अपक्ष आठ जागांपैकी दोन जागांवर स्वाती आनंदराव आंबी या निवडून आल्या
  • सासू कुसुम प्रमोद पोतदार यांच्यानंतर त्यांच्या सून श्रध्दा पोतदार सरपंचपदी विराजमान.
  • सर्वसामान्य मतदारांना गृहित धरणाऱ्या नेत्यांना मतदारांचा सूचक इशारा