कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार मात्र….

लोकसभेच्या निवडणुकीचा आणि महिला मतदारांचा विचार करता जवळपास निम्मे महिला मतदार आहेत. परंतु त्या तुलनेत लोकसभेला महिलांना अपवाद वगळता अजिबातच संधी मिळाली नाही, असे म्हणावे लागेल. निवेदिता माने या एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार असून त्यांना दोन वेळा लोकसभा जिंकून दिल्लीला जाण्याची संधी मिळाली.

लोकसभेचा मतदारसंघ हा मोठा असतो. त्यामुळे पक्षीय उमेदवारी आणि त्याला एकसंघ पाठिंबा यामुळेच लोकसभेचा विजय साकार होऊ शकतो. खासदार बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर १९९६ साली पहिल्यांदा निवेदिता माने या अपक्ष म्हणून काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या. परंतु त्यांचा २ लाख ९ हजार मतांनी पराभव झाला. १९९८ ला पुन्हा या दोघांमध्येच लढत झाली. तेव्हा पुन्हा आवाडे १२ हजार ९१४ मतांनी विजयी झाले. मात्र १९९९ साली राष्ट्रवादीकडून उभ्या राहिलेल्या निवेदिता माने यांनी आवाडे यांचा १२ हजार ८१२ मतांनी पराभव केला आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार बनल्या.

लोकसभा निवडणूक लढवणे तितके सोपे नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता विधानसभेला सुध्दा प्रस्थापित आमदारांच्या निधनानंतरच त्यांच्या पत्नीला संधी मिळाली आहे. अन्यथा ठरवून विधानसभेला महिलांना उमेदवारी देण्यात कोल्हापूर जिल्हा पिछाडीवर आहे. हल्ली काही वर्षातील उदाहरणे पाहता आमदार संजय गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संजीवनीदेवी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. याच पद्धतीने बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत अशा दोनवेळा संध्यादेवी कुपेकर आमदार झाल्या. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.