कोल्हापुरात भर दुपारी धाडसी चोरी! सहा लाखांचा ऐवज लंपास

गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत घरात घुसून चोरट्यांनी दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेला आहे. याची फिर्याद आशुतोष तानाजी साळोखे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिलेली आहे.

भर दुपारी झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. फिर्यादी आशुतोष साळोखे हे आपल्या घरात काम करीत बसले होते ते जेवण करण्यासाठी मरगाई गल्लीतील घराला बाहेरून कडी लावून शेजारीच असणाऱ्या दुसऱ्या घरात गेले होते.

याच दरम्यान घराची कडी काढून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून तिजोरीतील तीन तोळ्याचे जुने वापरातील गंठण, चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, तीन तोळ्याच्या लहान बांगड्या, कानातील टॉप्स अर्धा तोळे असे दहा तोळे सोन्याचे दागिने महागडी पर्स व रोख दोन हजार रुपये असा सहा लाख अकरा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

तीन वाजता ज्यावेळेस आशुतोष साळोखे घरात आले त्यावेळेस त्यांच्या नजरेस दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी लगेचच जुना राजवाडा पोलिसांना फोन करून चोरीची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून संशयित चोरट्यांचा माघ काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते सापडले नाहीत. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस अधिक तपास करीत आहेत.