मोहिते पाटलांची माढ्यात दणक्यात प्रचाराला सुरुवात…

माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील नाराज होते.दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं. यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचं सांगत याबाबत पक्षश्रेष्टींना बोलणार असल्याचं आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती. अजूनही भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला, तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेमध्ये असणारे मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांची तुतारी घेण्याचा आग्रह सुरू असला तरी अद्याप मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. असं असताना आजपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून दौऱ्यासाठी करमाळा येथून सुरुवात केली आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असून तातडीनं मोहिते पाटील प्रश्न सोडवला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, बारामती, सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदारसंघात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.