होळी सणाला होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा आजही शहरात पाहायला मिळते. गोवऱ्या, लाकूड यांच्या माध्यमातून होळी पेटवली जाते. तिला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून पूजाअर्चा केली जाते. त्यानंतर धूलिवंदनला धूळवड खेळली जाते. उत्तर आणि पश्चिम भारतीयांकडून रंगाची उधळण करत होळी साजरी केली जाते. त्यामुळे गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होणारी होळी इचलकरंजी शहरासह वेगळ्या पद्धतीने साजरी होताना दिसते. टिमकीचे वादन आणि होळी हे समीकरण शहरात पाहायला मिळत आहे.
अवघ्या पाच दिवसांवर होळी सण आला आहे. शहरात त्याची लगबग सुरू झाली असून गल्लोगल्लीत वेगळे वातावरण आहे.होळीसाठी लागणाऱ्या टिमक्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू झाली आहे. विविध प्रकारच्या वाद्यांच्या रुपात विक्रीस असणाऱ्या रंगबिरंगी टिमक्या लक्ष वेधून घेत आहेत. सकाळी भरणारी मुलांची शाळा सुटली की टिमक्यांच्या आवाजात अवघे शहर तल्लीन होताना दिसत आहे.मुख्य मार्गावरील बाजारपेठ टिमक्यांच्या रंगीबेरंगी स्टॉल्सने गजबजून गेली आहे. बालचमूमध्ये उत्साह संचारला आहे. बाजारात ढोल, ताशा, डमरू, हलगीसह विविध प्रकारच्या टिमक्या विक्रीस आहेत.