वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा!

केदारवाडी (ता. वाळवा) येथील येवलेवाडी फाट्यानजीक असलेल्या एका कंपनीच्या आरएमसी प्लांटच्या क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीपासून परिसरातील १०० एकर क्षेत्राच्या पिकावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तरी याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीची निवेदन निवासी तहसीलदार धनश्री यादव यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, या भागात केळी, झुकिनी, काकडी, कोबी, फ्लॉवर व पालेभाज्यांसह वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. मात्र प्लांटची धूळ नियमित पिकावर पडल्यामुळे भाजीपाला पिकांचा दर्जा खालावला आहे.व्यापारी असा माल परत पाठवत आहेत. ऊसपिकावरही त्याचा थर बसून त्याची वाढ खुंटली आहे. आसपास परिसरात लोकवस्ती असल्याने ग्रामस्थांना श्वसनाचे विकार होत आहेत.

आजाराचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे शेतीचे नुकसान होत आहे. तरी संबंधित कंपनीच्या आरएमसी प्लांटवर चालकावर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी एकत्र येऊन हा कंपनीचा प्लांट बंद पाडण्यात येईल.