वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रूक येथील शिवाजी गायकवाड (वय ४८) यांनी मुलगा आदित्य शिवाजी गायकवाड (वय २२) याच्या डोक्यात टिकाव घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दि.१५ रोजी सकाळी दहा वाजता ऐतवडे बुद्रूक येथील राहत्या घरी घडला. कुरळप पोलिसांनी संशयित शिवाजी गायकवाड यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
आदित्य शिवाजी गायकवाड याला दारूचे व्यसन होते. यामुळे घरात वारंवार वाद होत होता. आदित्य हा व्यसनाच्या आहारी गेल्याने व त्यांच्या वर्तणुकीमुळे वडील शिवाजी गायकवाड व घरातील सर्वांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या दररोजच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी शिवाजी गायकवाड यांनी राहत्या घरी मुलगा आदित्यच्या डोक्यात टिकाव घालून निर्घृण खून केला.या घटनेची कुरळप पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, बापू कुंभार, राजेंद्र जाधव, कौस्तुभ पाटील, राहुल पाटील, सलमान मुलाणी यांनी घटनास्थळी जाऊन संशयित वडील शिवाजी गायकवाड यांना ताब्यात घेतले.
