वाळव्यात पंचकल्याण महोत्सवाची जय्यत तयारी सुरु

वाळवा तालुक्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो. तब्बल १६ वर्षांनंतर वाळवा येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैनमंदिर कोटभाग यांच्यावतीने १४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान ७ दिवस श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून गावात मंगलमय वातावरण तयार झाले आहे.

कोटभाग जैनमंदिराच्या वेदी व शिखराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यापासून जैनबांधव श्रावक, श्राविका व कार्यकर्ते उत्साहात तयारीत व्यस्त आहेत. नागठाणे रस्त्यालगत पोपट दादू होरे यांच्या तीन एकर शेतजमिनीत भव्य व आकर्षक ४०० बाय १५० फूट आकाराच्या मंडप उभारणीचे काम सुरु आहे.

सदरचा कार्यक्रम कृष्णा नदीच्या तीरावर मंडपात होत असल्याने कार्यक्रमाला नैसर्गिक सौंदर्याचे  वातावरण मिळणार आहे. मंडपात धार्मिक कार्यक्रम, भोजनासाठी स्वतंत्रकक्ष अशी व्यवस्था असून, समोरच पार्किंगसाठी चार एकर क्षेत्रात व्यवस्था करण्यात आली आहे. सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी मंडपात सात हजार श्रावक श्राविकांची सोय होणार आहे तर परगांवहून महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांची निवास भोजनाची व्यवस्था संयोजकांनी केली आहे.

नुकताच परिसरातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थीतीत मुहुर्तमेढीचा कार्यक्रम संपन्न झाला. प. पू. १०८ आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज, नगरगौरव प. पू. १०८ निर्यापक श्रमणश्री धर्मसागरजी महाराज, व प. पू. १०८ निर्यापक श्रमण आगम चक्रवर्ती विद्यासागरजी महाराज सह संघ यांच्या सानिध्यात व मार्गदर्शनाखाली हा महामहोत्सव होणार आहे.

पूजाविधीसाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून नेज येथील संदेश उपाध्ये काम पाहणार आहेत. महोत्सवासाठी धर्मानुरागी महा- वीर होरे व सौ. डॉ. वंदना होरे हे सौधर्म इंद्र इंद्रायणी असून, धर्मानुरागी राजेंद्र मगदूम, धर्मानुरागी महावीर होरे, धर्मानुरागी सतीश होरे, धर्मानुरागी विनय होरे, धर्मानुरागी प्रकाश होरे, धर्मानुरागी प्रशांत मगदूम, धर्मानुरागी प्रदीप मगदूम, धर्मानुरागी संजय होरे, धर्मानुरागी प्रविण राजोवा, धर्मानुरागी उत्कर्ष होरे, धर्मानुरागी वर्धमान मगदूम यांनाही विविध मान मिळाले आहेत.

संगीतसाथ सुशांत पाटील दानोही यांची आहे तर राजेंद्र जैन हेही कार्यक्रमात रंगत आणणार आहेत. या मंगलमय सोहळ्यासाठी सकल दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, धर्मसागर पाठशाळा, वीराचार्य झांज पथक व गोमटेश ग्रुप कोटभाग वाळवाचे तमाम श्रावक, श्राविका, तरुण कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.