आचारसंहितेत अडकली हुपरीची ‘चांदी’

‘चांदीच्या कलाकुसरीमुळे देशभर प्रसिद्ध असलेला हुपरी परिसरातील चांदी व्यवसाय ऐन लग्न सराईच्या काळातच आचारसंहितेमुळे अडचणीत आला आहे. हुपरी परिसरातून पाठविले जाणारे चांदीचे दागिने, त्यातून मिळणारे पैसे देशभरातील चेकपोस्टवर जप्त केले जात असल्याने सहा हजार उद्योजकांना बनवलेल्या चांदीचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे.विशेष म्हणजे, बनवलेला माल परराज्यात पाठवणेच बंद केल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या४० हजार कामगारांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) या परिसरात चांदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. चांदीचा व्यवसाय करणारे सहा हजार उद्योग या परिसरात आहेत.हुपरी परिसरात चांदीचे तीन टन पैंजण रोज बनविले जातात. हा माल देशभर पाठवला जातो. सध्या लग्नसराई सुरू आहे. पैंजणला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, याच काळात आचारसंहिता सुरू असल्याने माल पाठवण्यास उद्योजक घाबरत आहेत. मागणी असूनही माल पाठवता येत नसल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे.