सांगोला तालुक्यातील पाण्याची परिस्थिती खूपच गंभीर

सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून जगजाहीर आहेच. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता खूपच वाढत चाललेली आहे. चालू वर्षी सांगोला तालुक्यामध्ये पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओढ्यावरील सुमारे 19 बंधारे व सहा तलाव हे कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे शेती तसेच जनावरांच्या पिण्याचा प्रश्न खूपच गंभीर बनत चाललेला आहे. टेंभू म्हैसाळ योजनेतून पाणी सोडून जर नद्यांवरील बंधारे भरून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची मदार असणाऱ्या एकमेव 82 गावचे शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून 25 ग्रामपंचायतीस त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू आहे. तर 15 ग्रामपंचायतीकडून पाणी मागणी वाढलेली आहे. मुख्य टॅंकमधून पाणीपुरवठा करण्यास सहकार्य संबंधित शाखा अभियंता करीत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी असूनही उन्हाळ्यामध्ये पाणी पाणी म्हणण्याची वेळ आलेली आहे.