संभाजीराजे पोहोचले वाड्यावस्त्यांवर….

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.दरम्यान, शाहू छत्रपती महाराजांची उमेदवारी निश्चित होताच संभाजीराजे छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.संभाजीराजेंनी पहिल्या दिवशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांना भेटी दिल्या.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपासून या भागानं छत्रपती घराण्याशी आपलं नातं जपलं आहे.या भागातील काही वयस्कर मंडळींना शाहूपुत्र राजाराम छत्रपती महाराज व मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांचा सहवास लाभला आहे. या मंडळीनी आवर्जून भेट घेत महाराजांच्या स्मृती जागवल्या.

हे आपुलकीचं भावबंध पुढील पिढीसोबत जोपासण्याची आमचीही जबाबदारी आहे. त्याच भावनेतून या भागाशी आजही आम्ही संपर्क ठेवला आहे, असं संभाजीराजे म्हणाले.आगामी लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती महाराजांनाच आम्ही मतदान देऊ, असा विश्वासही या वाकीघोलच्या जनतेने दिल्याचं त्यांनी सांगितलं.