आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकला. भाजपचे समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेमध्ये प्रवेश केला.तसेच कोल्हापूरमधील के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेहुणे आणि पाहुण्यांनीही अजितदादांचा हात सोडत शरद पवारांची भेट घेत शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले.
यानंतर कोणाचा नंबर, असा प्रश्न विचारला जात होता. त्याचे उत्तर सोलापूरमधून मिळाले आहे. भाजप आणि अजित पवार गटानंतर शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांनी धक्का दिला आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इन कमिंग सुरु आहे. कोल्हापूरमध्ये भाजप आणि पर्यायाने फणवीसांना धक्का दिल्यानंतर सोलापूरात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर डाव टाकला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सावंत यांची इच्छा आहे.टेंभूर्णी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दत्तात्रय सावंत यांनी पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर दत्तात्रय सावंत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंवर पक्ष सोडण्याचे खापर फोडले आहे.
शहाजी बापूंचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्तात्रय सांवतांनी शहाजी बापू जिल्ह्यात पक्ष वाढीला पोषक नाहीत, असा आरोप केला.ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चांगल्या योजना आणल्या जात आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे.
पण सोलापूर जिल्हा आणि सांगोला तालुक्यात पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबना केली जात आहे. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे, असा आरोप त्यांनी शहाजी बापूंचे नाव न घेता केला.सांगोला विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये शिवसेनेचे शहाजी बापू पाटील (99,464 मते ) येथून विजयी झाले होते.
त्यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख (98696 मते) यांचा अवघ्या 768 मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक साळुंखे यांना येथे फक्त 915 मते मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे जातो की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतो, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.