इचलकरंजीत पाच निवडणुकांत वेगवेगळ्या खासदारांना साथ!

इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधील गटबाजी कायम चर्चेचा विषय असायची.१९९६ च्या पूर्वीच्या निवडणुकीत अंतर्गत राजकारणाची उदाहरणे पाहायला मिळाली. १९९६ च्या निवडणुकीत बाळासाहेब माने यांच्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? अशी चर्चा होती. माने यांनी स्नुषा निवेदिता माने यांचे नाव पुढे आणले. पण, काँग्रेसने कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यातून माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसमधीलच दोन उमेदवारांत लढत झाली व आवाडे निवडून आले.

तिथून २००९ पर्यंतच्या पाच निवडणुकांत तीन वेगवेगळे खासदार झाले. इचलकरंजीतील गटातटाचे राजकारण मोठे होते. या निवडणुकीत आवाडे यांच्याविरोधात बाळासाहेब माने गट होता. १९९१ च्या निवडणुकीत उमेदवार उभे करणाऱ्या भाजपने (BJP) या निवडणुकीत गणपतराव सरनोबत यांना उमेदवारी दिली. तसेच भाकपचे के. एल. मलाबादे तसेच अन्य असे एकूण १३ उमेदवार रिंगणात होते.

निवेदिता माने (Nivedita Mane) यांनी आवाडे यांना जोरदार लढत दिली. तेरापैकी चार उमेदवारच आपला कस दाखवू शकले. इतर उमेदवारांना चार आकडी मतदान मिळाले. त्यात आवाडे यांना दोन लाख ३७ हजार, तर निवेदिता माने यांना दोन लाख नऊ हजार व गणपतराव सरनोबत यांना १ लाख २५ हजार मते मिळाली. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत आवाडे यांची लढत पुन्हा निवेदिता माने यांच्याशी झाली. माने यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली होती. त्यावेळी नऊ उमेदवार असले तरी दोघांतच लढत झाली. त्यावेळीही माने यांना अवघ्या १२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.

आवाडे यांना दोन वेळा संधी मिळाल्यानंतर १९९९ च्या निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवेदिता माने यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी काँग्रेसकडून आवाडे, तसेच शिवसेनेकडून पुंडलिक जाधव लढले. त्यात माने यांनी १२ हजार मतांनी विजय मिळवला. २००४ च्या निवडणुकीत माने यांच्याविरोधात शिवसेनेकडून डॉ. संजय पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी माने यांनी एक लाखावर मतांनी विजय मिळवला. २००९ मध्ये माने यांचा राजू शेट्टी यांनी पराभव केला.