महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
मुंबईतून महायुतीच्या उमेदवारांची जी यादी दिल्लीला गेली आहे. त्यामध्ये मंडलिक आणि माने या दोघांचीही नावे असल्याचे सांगण्यात येते. आपल्या कोणत्याही खासदारांची उमेदवारी कापली गेली तर त्याचा आमदारांपर्यंत संदेश चांगला जाणार नाही. हे शिवसेनेसाठी तसेच महायुतीसाठीही धोक्याचे असल्याचे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना पटवून दिले आहे. त्यामुळे या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु एकूणच भाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील धक्कातंत्रामुळे जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही, तोपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नाही, ही वस्तुस्थिती आहे.