4 खासदारांवर उमेदवारीची टांगती तलवार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena Shinde Faction)सुरुंग लावल्यानंतर 13 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता त्याच 13 खासदारांना पुन्हा एकदा खासदारकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असली, तरी त्यामध्ये किती जणांचा पत्ता कट केला जाणार आणि किती जणांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार? याकडे अजूनही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरूच आहे.

शिंदे गटातील किमान 4 खासदारांवर उमेदवारीची टांगती तलवार आहे. उमेदवारी मिळणार की नाही? यासाठी अजूनही त्यांची घालमेल सुरूच आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांमधील शिंदे गटाच्या खासदारांना तिकीट मिळणार की नाही? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. या जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे.

भाजपकडून पडद्यामागून चाचणी सुरू असल्याने या ठिकाणी या विद्यमान खासदारांना तिकीट मिळेल की नाही अशी स्थिती आहे. कोल्हापुरातून संजय मंडलिक सातत्याने प्रयत्न करत असले, तरी अजूनही कोणताही हिरवा कंदील मिळालेला नाही. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघावरही भाजपकडून दावा करण्यात आला आहे.