मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या विविध घोषणा……..

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना अनेक विविध घोषणा त्यांनी केल्या आहेत. सवलत, शेती पंपांना वाढविलेली २०० टक्के पाणीपट्टी माफ, इचलकरंजीतील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतून १०० कोटींचा निधी, साध्या मागाला १ रुपये, आधुनिकला ७५ पैशांची वीज सवलत अशा विविध घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
कोरोची (ता.हातकणंगले) येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाप्रसंगी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बॅँकेच्या माध्यमातून तीन हजार २०० कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला असून, त्यातून पुराचा प्रश्न नाहीसा होईल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी ७५० कोटी रुपये देण्यात येतील. त्यातून आवश्यक त्या सर्व ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारला जाईल. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल आणि मुख्य न्यायाधीश यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल.


इचलकरंजी शहरात रस्त्यासाठी नगरोत्थानमधून १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. त्यातून चांगले रस्ते करा. यंत्रमाग उद्योगाचे अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावले जातील. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे, तर साध्या यंत्रमागधारकांना एक रुपयांची सवलत देण्याची अंमलबजावणी केली जाईल. वारणानगर येथील दिव्यांग विद्यालयात रिक्त असलेली पदे आमदार विनय कोरे यांच्या मागणीनुसार भरली जातील. अंगणवाडी आणि मदतनीसांची रिक्त पदे भरली जातील. आशासेविकांना सरकार निराश करणार नाही, त्यांनाही न्याय दिला जाईल.

महिला बचत गटांना १५ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते, ते या सरकारने ३० हजार रुपये केले आहे. दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येत आहे. ज्येष्ठ व वयोवृद्ध महिलांनाही अनेक लाभ दिले जात आहेत. हे सरकार गरीब, कष्टकरी, सर्वसामान्यांचे आहे. मुख्यमंत्री हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले असून, गरिबांच्या दु:ख, वेदना, अडचणी त्यांना माहित आहेत. मुख्यमंत्री उद्योग योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना उद्योगमंत्र्यांनी लाभ द्यावा.