देशभरात होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. २५ मार्च आणि २६ मार्च होळी देशातील वेगवेगळ्या राज्यात होळी साजरी केली गेली मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी तर येत्या आठवड्यात होणार आहे. होळी रंग आणि आनंदाचा सण आहे आणि आता यंदाची होळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी खास असणार आहे.
या होळीच्या निमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळणार आहे. २५ मार्चला देशभरात होळीचा (धुळवड) सण साजरा केला गेला असला, तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी ३० मार्चला होणार आहे. या दिवशी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळेल, ज्यामध्ये महागाई भत्ता (DA), थकबाकी आणि घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ यासारख्या गुड न्यूज मिळतील.
आर्थिक वर्ष तसेच मार्च महिन्याचा शेवटचा दिवस, ३१ मार्च, रविवार असल्यामुळे केंद्रीय पगार ३० मार्च रोजी खात्यात हस्तांतरित केला जाईल असे अपेक्षित आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च रोजीही काही विशेष बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयने बँकांना शाखा सुरू ठेवण्यास सांगितले आहे.महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ४ टक्क्यांनी वाढवला, ज्यामुळे एकूण महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर गेला.
वाढीव महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकीही मिळेल. म्हणजे मार्चच्या पगारात दोन महिन्याच्या थकबाकीव्यतिरिक्त वाढीव डीएची देखील भर पडेल.दरम्यान, महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४% वाढल्यामुळे घरभाडे भत्ताही वाढला असेल आणि शहरांच्या श्रेणीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३०% पर्यंत एचआरएचा लाभ मिळेल. याशिवाय मार्च महिन्याच्या पगारात इतर भत्तेही जोडले जातील.