सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणूक लढत आहेत. तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार विद्यमान आमदार असून लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. सोलापुरातील एका बेरोजगार युवकाने भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्याने सोलापुरातील विविध समस्या मांडतानाच तरुणांच्या व्यथाही मांडल्या आहेत. या पत्रातून दोन्ही नेत्यांना उपरोधिक टोलेही लगावण्यात आले आहेत. हे पत्र जिल्ह्यात वाऱ्यासारखं व्हायरल झालं आहे. त्यावरून जोरदार चर्चाही रंगली आहे. अनेक तरुण हे पत्र जसंच्या तसं सोशल मीडियावर व्हायरल करत असून त्यावर व्यक्त होतानाही दिसत आहेत.
काय आहे पत्रात?
कु. प्रणितीताई यांचे पत्र पाहिले. अत्यंत कमी शब्दांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना करून दिलं. त्याला प्रतिउत्तर देत रामभाऊंनीही अत्यंत गंभीर आणि खोचक तसेच शिस्तबद्ध उत्तर दिलेले दिसत आहे. दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचे प्रदर्शन करत उत्तरांची सौम्य आगपाखड केली आहे, तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला..! परंतु माझ्या सारख्या तरुणाला आजही या प्रश्नांची उकल झाली नाही, ती म्हणजे मला सोलापूर सोडून का जावं लागतं? मला शिक्षण तर मिळतंय पण नोकरी का नाही? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर येते, पण पाणी का नाही मिळत?, असा सवाल या तरुणाने पत्रातून केला आहे.
तुम्ही दोघेही तरुण आमदार आहात. उच्चशिक्षित आहात. तरीही माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या नावे लढावे लागते, तर कधी एकत्र यावे लागते. परंतु आम्हाला कधीच तुम्ही शिक्षणाच्या नावे एकत्र करण्याच्या प्रयत्न केलाच नाही. रण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय. दोघांनीही पाच वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं.पण आमच्या सारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं.असो, तरी तुम्हा दोघांचेही स्वागत आणि अभिंनदन..!, असंही त्या पत्रात म्हटलं आहे.